Wednesday 19 October 2011

एकदा स्वतःवरच प्रेम करून पाहीन म्हणतो...




खूप पाहिली मित्रांची कमावलेली शरीरं आणि मैत्रिणींची गमावलेली वजनं
आता मात्र,
डोक्यावरच्या केसापासून पायाच्या नखापर्यंत झिजलेल्या स्वतःकडे एकदा लक्ष देईन  म्हणतो...

खूप हसवलं दुसऱ्यांना  तीसऱ्यांना  आणि सर्वांना
काही मला हसले तर काही माझ्या विनोदांना
रोज रात्री मनमुराद रडत झोपणाऱ्या स्वतःलाच एकदा हसवून बघीन  म्हणतो...

खूप वाचली पुस्तकं, लेख आणि कथा
कधीच गोंजारले नाहीत स्वतःचे रोग आणि व्यथा
आता पुस्तक वाचण्यापेक्षा,
स्वतःच्याच कपाळावरच्या आणि हातावरच्या रेघोट्या वाचीन  म्हणतो...

खूप  केले लोकांना inspire
कधी थोरा मोठ्यांच्या गोष्टी सांगून
तर  कधी मित्रांचीच उदाहरण देऊन
आता जरा स्वत्व हरवलेल्या स्वतःलाच नवसंजीवनी देईन  म्हणतो...

खूप फिरलो टेकड्यांवर नदीकाठी आणि पुलावर
वेड्यासारखा बोललो आणि हसलो त्या कट्ट्यांवर
आता त्याच सगळ्या जागांवर,
वेड्यासारखा स्वतःशीच मोठ्याने बोलीन  म्हणतो...

खूप पहिले खेळ, काही खेळून तर काही नुसतेच
नियतीने मांडलेल्या खेळाकडे केवळ प्रेक्षक म्हणून न बघता,
एक खेळाडू म्हणून त्यात भाग घेईन  म्हणतो...

खूप वाजवल्या टाळ्या, दुसऱ्यांच्या तिसऱ्यांच्या आणि सर्वांच्याच यशात
एकदा स्वतःलाच ताळ्यावर आणायला,
एका हाताने टाळी  गालावर वाजवीन  म्हणतो...

तीच गाडी तोच driver पण कोणालाच बरोबर न घेता
त्याच रस्त्याने परत एकदा कोकणात जाईल म्हणतो
समुद्राची पातळी वाढेस्तोवर रडून मोकळा होईन  म्हणतो...

दुसऱ्यांनी सतत काढलेले माझ्यातले दोष
खरंच आहेत का माझ्यात ते एकदा शोधीन म्हणतो...
आणि आरशासमोर उभा राहून,
कोणालाच न दिसलेला,
एक तरी गुण स्वतःत आहे का तेही एकदा शोधीन म्हणतो...

खूप  झाल राजकारण
जरा जास्तच  झाल समाजकारण
रक्ताच्या नात्यांशिवाय,
स्वतःशीच स्वतःच्या असलेल्या नात्याला जगण्याचे कारण बनवेल म्हणतो...

खूप विकला चांगुलपणा आणि खूप दाखवले औदार्य
खूपदा केले माफ आणि खूप दाखवली दया
बराचसा घालवल्यावर एकदा,
स्वतःवरच थोडासा पैसा आणि थोडा जास्तच वेळ खर्ची करीन  म्हणतो...

खूप शिकलो लोकांकडून आणि थोडा प्रयत्नही  केला शिकवायचा
खर तर  काडीचीही  किंमत  नसलेले, पण जगाच्या लेखी सर्वस्व असलेले
ते पुस्तकी  शिक्षण  एकदाचे  संपवून  टाकीन   म्हणतो...

खूप पाहिले अशिक्षित आणि खूप पाहिले उच्चशिक्षित
स्वतःला मात्र  सुशिक्षित बनवण्याचा ,
एक प्रयत्न करावा म्हणतो...


दुनियेची रीत कधीच नाही कळली 
आनंद दाखवू नये लोक दु:खी होतात
दु:ख दाखवु नये लोक आनंदी होतात
आता मात्र,
नफ्या तोट्याची गणित सोडवता नाही आली तरी चालतील
पण  नीट उतरवून तरी घेईन  म्हणतो...


स्वतःवरच करणार असल्याने नकाराची भीती नाही
स्वतःवरच करणार असल्याने होकाराचा फायदा नाही
तरी पण,
बाकीच्यांवर करून असेलच उरलेले थोडेसे तर
एकदा स्वतःवरच प्रेम करून पाहीन  म्हणतो...


 ~ केदार