Saturday, 8 February 2025


क्रिकेट हा आता 'वाचण्याचा' विषय नाही राहिला.


~ केदार हिरवे 

 

क्रिकेट हा खेळण्याचा नसून बोलण्याचा विषय आहे असं पु. लं. नी सांगून ठेवलंय.  खरंय ते पण मी लहान असताना पीच वर सचिन होता, कॉमेंट्री ला हर्षा होता आणि पेपर मध्ये द्वारकानाथ संझगिरी होते त्यामुळे माझ्यासाठी क्रिकेट हा बोलण्याचा, बघण्याचा, ऐकण्याचा आणि वाचण्याचा विषय होता.


द्वारकानाथ संझगिरी यांचा लेख मी पहिल्यांदा १९९६ साली वाचला असेल. त्यांची लेखन शैलीच अशी होती की तुम्ही जर क्रिकेट वेडे असाल तर त्यांच्या लिखाणाच्या प्रेमात पडल्याशिवाय राहत नाही . क्रिकेट लेखनात इतिहासाची उपमा देण्याची त्यांची पद्धत मला फार आवडायची. त्यातून त्यांचा इतिहासाचा अभ्यास आणि व्यासंग किती मोठा असेल ते पण कळतं. 


साधारण १९९६ पासून ते अगदी नुकत्याच झालेल्या २०२३ विश्व कप पर्यंत त्यांचे लेख कुठल्या ना कुठल्या पेपर मधून प्रसिद्ध होत होते आणि व्हाट्सअप च्या माध्यमातून व्हायरल होत होते. मॅच लाईव्ह पाहिली असेल आणि मॅच संपल्यावर त्याचे हायलाइट्स पाहिले असतील तरीपण दुसऱ्या दिवशी मॅच चे वर्णन त्यांच्या लेखणीतून वाचण्याची माझी उत्सुकता कायम राहिली.


अगदी वीस पंचवीस वर्षांपूर्वी त्यांनी पेपर मध्ये लिहिलेले लेख माझ्याकडे कात्रण स्वरूपात अजूनही आहेत आणि काही काही लेखातल्या ओळी तर कायमच्या लक्षात राहिल्या आहेत.  २००३ च्या  वर्ल्डकप फायनल नंतर त्यांनी सामना मध्ये लेख लिहिलेला त्याची हेडलाईन होती "भारताने विश्वविजयाचा चेक ऑस्ट्रेलियाच्या नावे लिहिला".   

राहुल द्रविड वर २००४ साली त्यांनी एक लेख लोकसत्ता मध्ये लिहिला होता त्याची हेडलाईन होती "संयमाचा द्राविडी प्राणायाम". 

 स्टीव्ह वॉ त्याच्या शेवटच्या टेस्टमध्ये, भारता विरुद्ध एक अफलातून इनिंग खेळला आणि  टेस्ट वाचवली.  त्यावर लेख लिहिताना त्यांनी लिहिले होते "सूर्य मावळताना तळपला".  

असे त्यांचे कितीतरी लेख कायमचे लक्षात राहिले आहेत. 


त्यांच्यामुळे मला सुभाष गुप्ते, बाळू गुप्ते, नरेंद्र ताम्हाणे,  पद्माकर शिवलकर, राजेंद्र गोयल ही नाव माहिती झाली. 

रवी शास्त्री, अजित वाडेकर, दिलीप वेंगसरकर, कपिल देव, अझर यांचे असंख्य किस्से मला त्यांच्यामुळे कळले.   त्यांची श्रीलंकन खेळाडूंशी चांगली मैत्री होती.  दिलीप मेंडिस, रॉय डायस विषयी त्यांनी लिहिलेले किस्से छान आहेत.  श्रीलंकन खेळांडूंप्रमाणेच श्रीलंका देशाबद्दलही त्यांनी लिहिलेले प्रवास वर्णन अप्रतिम आहेत.  त्यांची एक ओळ मला अजून आठवते,  एका लेखाचा शेवट करताना ते म्हणतात लंका इतकी सुंदर आहे की मी जर सीता असतो तर रामाला म्हणालो असतो ते रावणाला वगैरे मार पण आपण इथेच लंकेत राहू. रम्य ही स्वर्गाहुन लंका का म्हणतात ते कळालं. 


सचिन आणि संझगिरी यांच वेगळच नातं होतं.  सचिन च्या खेळीचे वर्णन करावं ते संझगिरींनीच असा तो काळ होता. सचिनची रणजी ची पदार्पण मॅच पण त्यांनी कव्हर केली आणि सचिनची दोनशेवी कसोटी पण. 


मुंबई क्रिकेटचा ज्ञानकोश होते द्वारकानाथ संझगिरी.  मुंबई क्रिकेट मधला एखाद नाव जर द्वारकानात संझगिरी यांना माहीत नसेल तर त्या नावाने कोणी क्रिकेट खेळलाच नाहीये असं गृहीत धरायला हरकत नाही.  सुनील गावस्कर, अजित वाडेकर, रवी शास्त्री यांना एकेरी संबोधण्याएवढी त्यांची घट्ट मैत्री होती. 


१९८३ पासून २०२३ पर्यंत बहुदा प्रत्येक विश्व कप त्यांनी कव्हर केला.  "सुनील-सचिन-विराट"  ही भारतीय फलंदाजीतली तीन युग कव्हर करणारे ते बहुदा एकटे असावेत.   Adelaide मध्ये थेट डॉन ब्रॅडमन यांचं दार ठोठवून त्यांना प्रत्यक्ष भेटण्याएवढं त्यांचं क्रिकेट प्रेम मोठं होतं. द्वारकानाथ संझगिरी - वासू परांजपे ही जोडगोळी सुपरहिट होती.  टीव्हीवर त्यांनी एकत्र बऱ्याच मुलाखतींचा प्रोग्राम केला.  त्या दोघांमधलं friendly banter आणि संझगिरी ज्या पद्धतीने वासू परांजपे यांच्याकडून किस्से काढून घ्यायचे ते बघायला मजा  यायची. 


क्रिकेट सोडून पण त्यांनी खूप लिखाण केलं.  त्यांची प्रवास वर्णनाची पुस्तक खूप आहेत.  ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड मी पहिल्यांदा त्यांच्या "पूर्व अपूर्व" पुस्तकातून पाहिल.  त्यांच्या "मुलखगिरी" आणि "माझी बाहेरख्याली" पुस्तकांमधून ते अक्षरशः आपल्याला बोट धरून जग फिरवून आणतात.  ती पुस्तक वाचल्यावर आपण खरंच त्या देशांमध्ये जाऊन आलोय अशा अधिकारवाणीने आपण त्या देशांबद्दल बोलू लागतो.  


ते हाडाचे शिवाजी पार्क वाले होते त्यामुळे जास्त भेटायचा योग आला नाही.  पुण्यात एक दोन प्रोग्रॅम च्या वेळी भेट झाली तेवढीच पण त्यांच्या लेखाला प्रतिक्रिया कळवल्यावर त्यांचा रिप्लाय कायम यायचा.  दोन वर्षांपूर्वी मी Adelaide ला स्थलांतरित व्हायचं ठरवलं तेंव्हा तिथे माझ्या ओळखीचं कोणीच नव्हतं.  तेव्हा अचानक मला आठवलं की संझगिरीनी एकदा त्यांच्या मुलासोबत Adelaide  चे फोटो टाकले होते.  त्यांचा मुलगा बहुधा राहत असावा असं वाटून मी त्यांना मेसेज केला आणि मुलाचा नंबर मागितला.  त्यांनी पण काही आढेवेढे न घेता नंबर दिला.  त्यांच्या मुलाशी मी संपर्क साधला.  त्याने मला बरंच  मार्गदर्शन केलं.  'रोहन आणि प्राजक्ती' च्या रूपात मला Local Guardian  मिळाले असं म्हटलं तरी चालेल.  (क्रिकेटच्या अतिसेवनाचे हे फायदे). 

 

मागील बरीच वर्ष ते आजाराशी लढत होते तरी पण मला खात्री होती की नुकत्याच डिसेंबर मध्ये जी Adelaide  टेस्ट झाली त्याला ते येतील.  त्यांच्यासोबत बसून टेस्ट मॅच पहायचे स्वप्न हे स्वप्नच राहिले.  आता त्यांच्या मुलाच्या नजरेतून मला माहित नसलेले संझगिरी  मला पाहायचे आहेत. 


हल्ली कुठल्या साली जन्माला आलोय त्याप्रमाणे Gen Z, Gen Alpha वगैरे वर्गीकरण करतात म्हणे.  मला ते फारसं कळत नाही.  मी त्या 'Gen' चा आहे ज्यांनी सचिनची बॅटिंग पाहिली, हर्षा भोगले ची कॉमेंट्री ऐकली आणि दुसऱ्या दिवशी मॅच चे वर्णन संझगिरींच्या लेखणीतून वाचले.  आम्ही "Gen-नशीबवान" आहोत. 


बालपण संपलं त्याचप्रमाणे बालपणीच्या ज्या चांगल्या आठवणी आहेत त्याही पुसल्या जात आहेत . संझगिरींच्या जाण्याने अजून एक बालपणीची सुखद आठवण पुसली गेली आणि खरंच क्रिकेट हा खेळ आता 'वाचण्याचा' विषय नाही राहिला.