Monday 7 November 2011

दैवत









काही काही नावं अशी असतात जी आपण पहिल्यांदा कधी ऐकली ते सांगू शकत नाही. आई वडिलांची आणि आपली ओळख कोणी करून देत नाही. लता दीदींचा आवाज पहिल्यांदा कधी ऐकला ते सांगता येत नाही. तसेच पुरुषोत्तम लक्ष्मण  देशपांडे हे नाव पहिल्यांदा कानावर कधी पडले ते आठवत नाही पण जेंव्हा कानावर पडले तेंव्हा हसू नक्की आले असणार. 

आम्हाला शाळेत  असताना पुलंचे काही धडे अभ्यासाला होते.  अंतू बर्वा, उपास या धड्यांमुळे पुलंची ओळख होत होती. त्या व्यतिरिक्त घरात पुलंच्या बऱ्याच कॅसेट होत्या. त्यात चितळे मास्तर, म्हैस, पोस्ट ऑफिस, माझे शत्रुपक्ष अश्या अनेक गोष्टी पहिल्यांदा ऐकल्या आणि तेंव्हा पासून पुलंनी मनात घर केले होते, मनमुराद हसवत होते. तेंव्हा शाळेतील धडे सोडून ज्या काही पुलंच्या थोड्याफार गोष्टी ऐकलेल्या होत्या त्याचा मराठीच्या पेपरला खूप फायदा व्हायचा. मी पत्र लिहिताना त्या उपमा बेमालूमपणे वापरायचो. आठवीत असताना 'माझा आवडता खेळाडू' निबंध लिहिताना त्याचा शेवट 'तो जर मला भेटलाच तर मी एकच वाक्य म्हणेन  - कोण तुजसम सांग मज गुरुराया' असा केलेला आठवतो. हा पुलंची पुस्तके वाचण्याचा परिणाम होता.

तर अशा रीतीने शाळेतल्या २-३ धड्यातून आणि घरच्या कॅसेट मधून पुलंनी वेड लावले होते. 
त्यांची बाकीची पुस्तके खुणावत होती. याच वेडापायी मी नववीच्या उन्हाळाच्या सुट्टीत पुणे मराठी ग्रंथालयात जायला लागलो आणि पुस्तके वाचण्याचा सपाटा लावला. त्या सुट्टीमध्ये, ते ग्रंथालय उघडणारा शिपाई आणि रात्री दिवे बंद करून कुलूप लावणारा शिपाई यांना मी सोबत केल्याचे आठवतय. 

खोगीरभरती,  बटाट्याची चाळ, असा मी असामी,  ह(फ)सवणूक , गणगोत, व्यक्ती आणि वल्ली,  नस्ती उठाठेव, अपूर्वाई, उरलासुरला अशी अनेक पुस्तके त्या सुट्टीत वाचली आणि या लेखकाच्या प्रेमात पडलो. माझ्या घरापासून एक किलोमीटर  अंतरावर राहत असलेल्या या माणसाला भेटावे, पाया पडावे असे वाटू लागले आणि तीच  उन्हाळ्याची सुट्टी संपत असताना म्हणजे १२ जून २००० या दिवशी या माणसाचे मी पहिले दर्शन घेतले ते त्यांच्या अंतयात्रेत. पहिले आणि शेवटचे दर्शन !

त्या दिवसापासून रोज हा माणूस माझ्या बरोबर असतो. 

आई वडिलांनंतर जर कोणी माझ्यावर संस्कार केले असतील तर ते या माणसाने !!

३ वर्ष मुंबईत राहताना, पुण्यातून दर सोमवारी निघताना  पुलंचे पुस्तक बरोबर न्यायला  कधीच विसरलो नाही.
रात्री रूमवर घरच्यांची आठवण आल्यावर व्यक्ती आणि वल्ली मधले  'ते चौकोनी कुटुंब'  किंवा गणगोत मधले 'बाय' , 'ऋग्वेदी' , 'आप्पा' हे लेख का वाचले याला उत्तर नाही. 
आपल्याला आवडलेल्या एखाद्या मुलीचे लग्न ठरल्याची बातमी ऐकल्यावर त्या रात्री  'नंदा प्रधान' १० वेळा का वाचले याला उत्तर नाही.
अंतू बर्वा, बबडू, रावसाहेब , हरितात्या, नारायण, लखू रिसबूड, बापू काणे , बोलट, भय्या नागपूरकर या आणि अशा अनेक पात्रांनी काय शिकवले ते शब्दात सांगता येणार  नाही . 

अपूर्वाई वाचताना मी पण पहिल्यांदा विमान प्रवासाला निघालो तर माझी पण अशीच तारांबळ उडेल,पहिल्यांदा कोट घालताना अशीच  धांदल उडेल असे वाटत राहते.  असे वाटणे , पुलंमध्ये प्रत्येक मराठी माणसाने स्वतःला पाहणे हेच त्यांचे सर्वात मोठे यश आहे. 

'पुणेकर मुंबईकर नागपूरकर' मध्ये पुलंची दृष्टी कळून येते. लहान लहान गोष्टींचे निरीक्षण अफलातून. पुलंनी डोळे उघडे ठेऊन फिरायला शिकवले. 

'एक शून्य मी' वाचल्यापासून माझी एकही दिवाळी अशी गेली नाही कि ती "आमच्याकडे धाच पैसे आहेत " म्हणणारी मुलगी आठवली नाही.

प्रत्येक गोष्टीचा शेवट करण्याची पुलंची एक खास पद्धत. अंतर्मुख करायला लावणार, हसता हसता रडवणार. 
'गणगोत' मधल्या प्रत्येक व्यक्तिचित्राचा शेवट असो किंवा 'व्यक्ती आणि वल्ली' मधल्या काल्पनिक व्यक्तिचित्रांचा शेवट असो,
'असा मी असा मी' मधले ते शेवटचे घड्याळाचे वाक्य असो किंवा 'बटाट्याची चाळ' मधला  शेवटचा सीन असो,
शेवट कायम विचार करायला लावणारा आणि त्यामुळेच लेखनाची छाप मनावर कायमचा उमटवणारा.

केवळ लेखक म्हणून नाही तर माणूस म्हणून पु ल किती मोठे होते ते त्यांच्यावर इतरांनी लिहिलेल्या पुस्तकातून कळते. 
त्यांचे समाजकार्य थक्क करणारे आणि महत्वाचे म्हणजे या कानाचे त्या कानाला कळू न देता केलेले समाजकार्य.
या समाजाचे आपण फार मोठे देणे लागतोय हे पुलंनी शिकवले.
आपल्याकडे जे जे आहे ते ते सर्व दुसऱ्यांना द्यावे. To give is the fastest way to gain  हे पुलंनी शिकवले मग ते पैसा असो वा पुस्तके हात आखडता घेणे नाही. 
जे जे चांगले ऐकले, पाहिले किंवा वाचले आहे ते ते इतरांना  सांगून त्यांच्या पण आयुष्यात बहार आणली पाहिजे. माणसाला दु:खी कष्टी करणाऱ्या गोष्टी हल्ली पावला-पावलावर घडतात. रडवणारे खूप आहेत हसवणारे थोडे म्हणून आपण दुसऱ्यांच्या रुक्ष चाकोरीबद्ध जीवनात जर क्षणभरासाठी जरी धमाल उडवू शकलो, आनंदयात्रा बनवू शकलो, तरी ते पुण्याचे काम हि शिकवण  पुलंचीच

कधी कधी मी विचार करतो कि आपण लोक आपल्या पुढच्या पिढीला काय देऊन जाणार ? काय शिकणार पुढची पिढी आपल्याकडून ?  अशी कुठली गोष्ट आहे का कि जी आपण मागे ठेऊन जाऊ शकतो ज्यामुळे पुढच्या पिढीला मदत होईल ? त्यांच्यावर संस्कार होतील ? आयुष्याच्या प्रत्येक क्षणी त्यांना साथ देईल अशी काही वस्तू आपण पुढच्या पिढीला देऊ शकतो का ?
या सर्व प्रश्नांची उत्तरे मला मिळतात जेंव्हा मी घरातल्या पुस्तकांच्या कपाटाकडे बघतो.
पुलंची पुस्तके ... खऱ्या अर्थाने संस्कारांची शिदोरी ..ज्यांनी वाचली त्यांना माझे म्हणणे पटेल 

ipod, laptop, mp3, VCD, DVD मुळे तर हि शिदोरी कायम जवळ बाळगता येते आणि आमच्या corporate life मध्ये त्याची सतत गरज पडते.

तासनतास  मीटिंग  मध्ये  बसून  डोके  खराब  होते. तीच  ती  फालतू  बोल  बच्चन ऐकून  बोर होते. तेच  ते  sugar coated words ऐकून  कान  कीटतात. त्या  timelines .. ते  billability .. ते schedule डोक्यात  जाते. पोटासाठी  काय  काय  करावे  लागतंय  असा  विचार  मनात  चमकून  जातो. या  IT जगाचाच  तिटकारा  वाटू  लागतो. अश्या  मीटिंग  संपवून  मी  कसा  बसा डेस्क  वर  येतो  .. pc unlock करतो. headphone कानाला  लावतो  आणि  desktop वरच्या  एका  folder वर  double click करतो  ... पहिलीच  file, A ने  चालू  होणारी,  open  करतो  ... 

कानात  "रत्नागिरीच्या  त्या  मधल्या  आळित  लोकोत्तर   पुरुष  राहतात " अशी  ओळ  ऐकू  येते  आणि  पुढची  30 मिनिट  हा  माणूस  माझा  ताबा  घेतो  .. 

सर्व दु:ख विसरली जातात .. क्षीण क्षणात नाहीसा होतो .. हा  माणूस  आपल्याला  सोडून  गेलेला  नाही  .. जाऊच शकत नाही ... खूप उपकार आहेत या माणसाचे आपल्यावर ..

पु.ल. तुम्ही अजरामर झालात. 

पु. ल. जन्मदिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा.

 ~ केदार

8 comments:

  1. jyada bhari re kedar.......wadhdiwsachya shubhechha......!!!!!

    ReplyDelete
  2. Amazing.... Pu lanchi sagali pustak ekdam dolyasamorun geli... Sundar lekh kedya... पु. ल. जन्मदिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा.

    ReplyDelete
  3. Khup chaan.....
    Pu La ni kelele samjkary kase hote yaache ek udaharan..... mi mulacha Uttur ya gavacha...kolhapur pasun 70 km Amboli -Goa route var majhe gaav... tithal pahili mothi shala Uttur Vidyalay Uttur ithe Prayog Shaale sathi Pu la ni 51000 chi denagi dili aaahe....
    it was way back in 1980. Just imagine ha maanus kiti daanshur hota..... ashaa kititari gosti aahet....
    Pu La na laakh laakh Salaam...
    Pu La nchi ani tyanchi pusatke waachnaryaachi wavelength julali nahi ase kadhihi nhonaar nahi...

    Kedar jar ka aaj PL asate tare tyani Nakki IT waalyanchavar lihila asata ek Farmaas Fars....!!! khup majaa aali asati tyanche observation aikayala...

    ReplyDelete
  4. खास च रे Kedya..
    लई भारी..

    ReplyDelete
  5. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  6. 'पु.ल.' या व्यक्तीबद्दल कोणीही काहीही लिहिलं तरी मी ते अधाशासारख वाचतो. हा लेख वाचायला सुरुवात करण्यामागचा हेतू तोच होता. पण पकड घेतलीस मित्रा.. शेवटपर्यंत शब्द-न-शब्द वाचून काढला..अतिशय भावूक करणारे लिखाण.. प्रचंड सुंदर!

    ReplyDelete